कथा- मोबाईल गेम
लेखिका सौ. मेधा कामत
(संस्कारदीप २०१८ दिवाळी अंकातून साभार)
विद्यार्थ्यांच्या लाडक्या शिक्षिका वेदांगी विचार करत होत्या, खरंच एवढासा चिन्मेश, आज त्याच्या छोट्याशा व्याख्यानासाठी आमच्या शाळेच्या सर्व शाखांना एकत्र करुन त्यांच्यासमोर तो बोलणार आहे. किती समर्पक बोलला तो वर्गात. तेवढ्यात शिपाई सांगायला आला, शाळेच्या गाडीतून आणले चिन्मेशच्या घरचे आई बाबा, छोटी बहिण, काका, आजी, सर्वाना.
विद्यानिधी शाळेच्या मुख्याध्यापिका कुसुमावतीनी मोठया उत्साहाने आजचा छोटासा कार्यक्रम फक्त चिन्मेशसाठीच नाही तर सर्व विद्यार्थीवर्ग, पालकवर्ग, शिक्षकवर्ग साऱ्यांसाठीच जमवून आणला.रोज बालवयातील विद्यार्थीदशेत “पिंकी नीडल”चे बळी ठरलेल्यांच्या बातम्या ऐकून-वाचून सुन्न वाटत असतानाच त्यादिवशी विद्यानिधी शाळेमध्ये शिकणारा राजन राजे “पिंकी नीडल”चा बळी ठरला. त्या बातमीने वेदांगी मॅडमच नाही तर संपूर्ण शाळाच हबकून गेली. शिक्षकवर्ग राजनच्या घरी गेले असताना “पिंकी नीडल”च्या गेममुळे हे घडल्याचे राजनच्या आई-वडिलांकडून कळले. दुसऱ्या दिवशी शाळा बंद ठेवण्यात आली. तिसऱ्या दिवशी चिन्मेशला सोडायला त्याच्या आजी आल्या. राजन व चिन्मेश एकाच वर्गात शिकत होते. चिन्मेशची आई नोकरी करीत होती. राजनची आई गृहिणी होती. तिची चिन्मेशच्या आजींशी ओळख होती. चिन्मेश आजीबरोबर घरी आला. चिन्मेशची आई चैतन्या ऑफिसमधून आल्यावर आजीने राजनच्या मृत्युचे कारण तिला सांगितले; सांगताना ऐकताना दोघींचे डोळे पाणावले. चैतन्या आजीला म्हणाली, “मी उद्या परवा जाईन, आज तुम्ही जाऊन या आता. हा एकटा आहे घरी, ह्याचे बाबाही आज उशीरा घरी येणार आहेत.” आजी आजोबांसह जाण्यासाठी बाहेर पडल्या. चैतन्याने चिन्मेशला बोलविले, विचारले “अरे तुला राजनच्या ह्या मोबाईल खेळाबद्दल माहित होते कां? कधी बोलला नाहीस.” चिन्मेश म्हणाला, “नवा मोबाईल आणला त्याने शाळा उघडली जूनमध्ये तेव्हा! राजनने मला दाखवला तो मोबाईल आणि मला म्हणाला “माझे बाबा कारखान्याचे मालक आहेत म्हणून त्यांनी बघ मला हा मोबाईल दिला.” रोज सुरुवातीला मला बोलवायचा, फोनवर गेम खेळूया म्हणायचा. मी सांगितले त्याला “आई घरी यायच्या आत मला माझा शाळेचा अभ्यास पूर्ण करायला हवा. घरी आल्यावर आई जास्तीचा अभ्यास घेते तिचे काम करता करता! मी नाही येणार, आजीला फसवून! आईला नाही आवडणार.” रात्री जेवताना राजन येत नाही संध्याकाळी मैदानात, असे चिन्मेश घरात सांगत असे ते आठवले चैतन्याला. “अरे तेंव्हा काय म्हणाला तुला तो?” “आजीचे पाय दुखतात, दाबत बसतो, आजीची सेवा करतो मी.” असे तो मला सांगत असे. त्याची आजी झोपूनच असते, खूप म्हातारी आहे. मला कसे कळणार खरे खोटे? एक-दोन वेळा बोलला तो मला की पिंकी नीडल काय मस्त गेम आहे, सॉल्लिड!
आजी घरी आल्यावर तिला हे सर्व समजले चैतन्याकडून! आजीने चिन्मेशला जवळ घेऊन समजावले “बाळा, तुझ्या वर्गातल्या इतर मुलांना तू सांग बरे की असे गेम खेळू नका; आई-वडिल आपल्यावर किती माया करतात, त्यांचे ऐकायचे सोडून कोणीतरी अनोळखी माणूस फोनवरून सांगतो ते ऐकणे हा आज्ञाधारकपणा नाही; असे करू नका; पिंकी नीडलच्या गेममुळे राजन वाईट वागला व त्याचा जीव गेला. आपल्या आई-वडिलांना प्रत्येक गोष्ट सांगा. आपल्या आईने आपल्याला जन्म देताना तिचे रक्त, तिची शक्ती वापरून आपल्याला जन्म दिलेला असतो. आई-वडिल मुलांना लहानाचं मोठं करताना किती कष्ट करतात. मुलांची आजारपणं, दुखणी काढतात, त्यांना कोणतीही गोष्ट कमी पडू नये म्हणून किती झटतात. स्वतःची नोकरी सांभाळून ते मुलांना कपडे-वह्या-दप्तर-पुस्तके चांगली देता यावी म्हणून किती त्रास घेतात, काळजी घेतात, लाड करतात.
चिन्मेशने मनाशी ठरविले, शाळा भरल्यावर प्रार्थनेनंतर तो वेदांगीबाईना म्हणाला, “मला सर्व मुलांना काही सांगायचे आहे. राजनसारखे वागू नका, हा माझ्या आजीचा निरोप द्यायचा आहे”; आणि चिन्मेशने मुलांना समजावले. त्याच्या ह्या छोटेखानी बोधपर भाषणाबद्दल वेदांगीबाईनी मुख्याध्यापिका कुसुमावतीबाईना सांगितले. त्यांनी मनावर घेतले व स्वतः ऐकले त्याला बोलावून ऑफिसच्या कॅबीनमध्ये. दोघींनी मिळून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले.
सर्व विद्यार्थी व पालकवर्ग, शिक्षकवर्ग जमला होता. वेदांगीबाई व कुसुमावतीबाईनी श्रोतृसमुदायाचे स्वागत केले. चिन्मेश टिळकचे नाव जाहीर केले व तो बोलायला उभा राहिला. “सर्व पालकांना व शिक्षकांना माझे वंदन! मित्रांनो व मैत्रिणींनो, आपला दोस्त राजन आज आपल्यात नाही, त्याने एवढी मोठी शिक्षा त्याच्या आई-बाबांना का दिली? त्यांनी त्याला मोबाईल दिला म्हणून का? हे मला माहित नाही. पण माझ्या आजीने मला सांगितले तुम्हाला निरोप द्यायला तिचा. आपण मुले आपल्या आई-वडिलांची ना? मग आपण त्यांच्यावर, आजी-आजोबा, काका-काकी, घरी जे आहेत त्यांच्यावर खूप माया करायला हवी. जे घराबाहेर घडते ते आई-बाबांना सर्व सांगायला हवे. शाळेत घडतात त्या गोष्टी शिक्षकांना सांगायला हव्या. आपण खूप अभ्यास करायला हवा, खूप खेळायला हवे खुल्या मैदानात. आई-वडिलांपासून कोणतीही गोष्ट लपवू नये. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट करावी. दुसरे कोणी घराबाहेरचे जर आपल्याकडून काही करण्यासाठी जबरदस्ती करत असेल, किंवा यंत्र-मोबाईलही वाईट गोष्टी करायला सांगत असेल तर त्यांचे न ऐकता, आई-बाबांच्या कानावर घालावे. प्रत्येक गोष्ट त्यांना सांगितल्यामुळे ते आपल्याला योग्यप्रकारे ज्ञान देतील, माहिती देतील व आपले रक्षण करतील. आपल्यासाठी व आपल्याकडे बघून ते जगात असतात, त्यांना कधीही दुखवू नका, कोणतीही गोष्ट न सांगता स्वतःच्या मनाचे करू नका. ते आपले रक्षक-पालक आहेत. आपली काळजी आपल्या घरातली माणसे घेतात; त्यांना प्रत्येक गोष्ट कळायला हवी. अभ्यास वेळच्यावेळी पुरा करून खेळ-व्यायाम करुन आल्यावर, संध्याकाळी देवाला नमस्कार करताना रोज आई-बाबांना व घरात आजी-आजोबा असतील तर त्यांना पायाला हात लावून नमस्कार करावा. आजी-आजोबा, आई-बाबा आपल्याला त्यांच्या लहानपणीच्या आठवणी-गोष्टी सांगतील, त्यातून आपल्याला छान शिकवण मिळते. माझी आजी माझ्या बाबा-आत्या-काकांना त्यांच्या लहानपणी संतांची, समाजसुधारकांची, वैज्ञानिकांची, थोर नेत्यांची, स्वातंत्र्य-सैनिकांची चरित्र असलेली पुस्तके आणून देई व त्यांच्या जयंती-पुण्यतिथीला ती पुस्तके वाचण्यास सांगे; त्या वाचनाने लहान वयातच मनाचा पाया सदाचाराचा बनतो आणि वाचनसंस्कार घडतात असे आजी म्हणते. छान छान कपडे घालावे, जेवण जेवावे व खाऊ खावे इतकेच फक्त आपले काम नसते. आणि हो, आपण चांगले वागलो तर पुढच्या जन्मी माणूसच होणार, नाहीतर कोणतातरी दुसरा जन्म मिळणार. आपल्या देशावर प्रेम करण्यासाठी आधी आपल्या घरातील प्रत्येकावर माया करायला हवी. फक्त अभ्यास न करता, व्यायाम, मैदानी खेळ, गोष्टी, गाणी, यासाठीही वेळ द्यायला हवा. मोबाईलसारख्या यंत्रांनी आपण बिघडू शकतो. ते आपले काम नाही. आई-बाबांना वाईट वाटेल असे आपण वागू नये. अभ्यासाचा, वागण्याचा नेहमी आनंद व्हायला हवा. पिंकी नीडलसारखे गेम असतील, त्यापासून दूर राहायला हवे. त्याच्या आईने सांगितले तो झोपेत बोलत असे शूरपणे; “मी धाडसी आहे, मी शूर आहे, मी आहे डॅशिंग, उडी मारुनही उभा राहीन, मरणार नाही, मला त्या उडीने खूप पैसे मिळतील, ते माझे स्वतःचे, ते आई-बाबांना देईन, मोठी गाडी घ्यायला सांगीन, आत्याच्या गाडीसारखी! आत्याच्या मुलीला पिंकीला सांगीन, बघ तुझ्या नावाचा गेम – कित्ती मज्जा!” माझ्या दोस्तानो ऐकाल ना माझे? एवढे बोलून चिन्मेश गहिवरला. वेदांगीबाई त्याच्याजवळ गेल्या, त्याला जवळ घेतले.
सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
मुख्याध्यापिका कुसुमावतीबाईंनी त्याला पोटाशी धरले व म्हणाल्या, “छोट्यानो, ह्या लहानाकडून जे ऐकले ते तुम्हाला पटले असेलच. तेव्हा वाईट गोष्टींकडे कधी वळू नका. आई-वडिलांना प्रत्येक गोष्ट सांगा.” “पालकांनो, तुम्हाला विनंती माझी, तुमची लेकरे अजाण आहेत. त्यांचे फाजील लाड तर आपण करत नाही ना ह्याचे भान ठेवा; आपल्या आई-वडिलांनी आपल्यावर केलेले संस्कार स्वतःच्या मुलांवर करताना ढिलाई करु नका. मैदानी खेळ, व्यायाम ह्यांचे महत्व त्यांना पटवून द्या; संगीत-कला-शास्त्र ह्याची गोडी लावा. तरच ते उज्वल भविष्यासाठी यशस्वी वाटचाल करतील. स्वतःचे कुटुंब स्वतःच उध्वस्त करु नका.”
चिन्मेशचे आई-बाबा त्याच्याजवळ धावले. त्यांच्याबरोबर स्टेजवरुन उतरुन चिन्मेश आजीला बिलगला; म्हणाला “आजी, सांगितला ना तुझा निरोप सर्वांना? बरोबर बोललो ना ग मी! आजी म्हणाली “चिन्मेश तू गुणाचा बाळ आमचा.” आजोबांनीही शाबासकी दिली.
© मेधा श्रीश कामत
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#पालकमंत्र